देसाईगंज : लोखंडी रॉड व पावड्याने मारुन हत्या, बापलेकासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

1403

– विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : तालुक्यातील कोंढाळा येथील दिनेश दिगांबर झिलपे (वय ३७ ) याची गावातीलच तिघांनी लोखंडी रॉड व पावड्याने मारुन हत्या केल्याची घटना २४ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ होता, न्यायालयात पुरावे सदर केल्याने विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी पुरावा योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन आज २१ मे २०२४ रोजी आरोपींना जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपींमध्ये शामराव अलोने (वय ५७), राजु ढोरे (वय ३६), विनायक अलोने, (वय ३७) तिघेही रा. कोंढाळा यांचा समावेश आहे. आरोपी शामराव अलोने याने त्याच्या दुकानासमोर एक वर्षापुर्वी मृतक दिनेश याच्या पायावर व डोक्यावर कु­हाडीने वार केला होता. परंतु त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोपी शामराव याने खर्च केला होता. त्यामुळे त्याबाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. परंतु काही दिवसाने आरोपी शामराव व त्याचा मुलगा विनायक हे पैशाची मागणी दिनेशकडे करु लागले. त्यावरुन जुन्या रागावरुन तिन्ही आरोपींनी तान्हापोळ्याच्या दिवशी २८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास पावड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत दिनेशची हत्या केली व मृतदेह कोंढाळा ते रवि रोडवर जंगलामध्ये फेकुन दिले. दिनेशला मारहाण करताना त्याची पत्नी निता हिने बघितले असता तिने तिचे सासरे दिगांबर झिलपे यांना माहिती दिली.
त्यावरुन फोनद्वारे पोलीस स्टेशनला माहिती दिली. याप्रकरणी पोलिस ठाणे देसाईगंज येथे गुन्हा दखल करून तिघांना अटक करण्यात आली होती.
अधिक तपासादरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर मृतकाचे प्रेत आरोपी शामराव यांनी लपवुन ठेवलेली जागा दाखविली व मयताचे प्रेत ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळुन आले. तसेच लोखंडी रॉड व पावड्यावर रक्ताचे डाग आढळुन आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. त्यावरुन खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन आज २१ मे २०२४ रोजी आरोपी शामराव अलोने व राजु ढोरे यांना कलम ३०२, २०१, ३४ भादवी अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी १ लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी विनायक अलोने यास कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेप व ७५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रु. २ लाख ७५ हजार मयताची विधवा पत्नी निता दिनेश झिलपे हिला देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.
सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान व सहा. सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा शैलेश काळे, सपोनि./अतुल श्रावन तवाडे, पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj #kondhala #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here