– पीएलजीए सप्ताह दरम्यान नागरिकांचा गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, ८ डिसेंबर : जिल्ह्यातील उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत २० भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
२ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षली याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे संकल्पनेतुन नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या २० भरमार बंदुका गुरुवार ८ डिसेंबर २०२२ रोजी उपपोस्टे दामरंचा येथे पोलीस दलाच्या स्वाधिन केल्या.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली उपपोस्टे दामरंचाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र कपले, पोउपनि उमेश कदम, पोउपनि शिवराज लोखंडे, पोउपनि सचिन घोडके तसेच उपपोस्टे दामरंचा येथील पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अहेरी उपविभागातील नागरिकांनी ८ भरमार बंदुका व १ बॅरल केले होते स्वाधीन
५ डिसेंबर २०२२ रोजी उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला चंद्रा व कुडकेली गावातील नागरिकांनी ०८ भरमार बंदुका व १ बॅरल पोलीसांच्या स्वाधीन केल्या होत्या.
आता गुरुवार ८ डिसेंबर २०२२ रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत २० भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Police)














