चिमूर : मानेमोहाळीत वाघाचा शिरकाव, झोपडीतील बैल केले ठार

484

– नागरिक दहशतीत, शेती करायची कशी ?
The गडविश्व
मासळ बू (चिमूर), दि. १६ : चिमूर तालुका मुख्यालयापासून जेमतेम १५ किमी अंतरावर असलेल्या मानेमोहाळी येथे वाघाने शिरकाव करीत झोपडीमध्ये बांधून असलेल्या बैलावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना रविवार १६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी विठ्ठल श्रीरामे यांच्या मालकीचे ते बैल होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मानेमोहाळी हे गाव चिमूर तालुक्यातील मासळ बूज नजीक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत आहे. या परिसरात वन्यप्राणी शिकारीच्या शोधात भटकत असतात. दोन दिवसांपूर्वी मानेमोहाळीच्या शेतशिवारात वाघ निदर्शनास आला होता. आता दोन दिवस उलटत नाही तो रात्रीच्या सुमारास वाघाने गावामध्ये प्रवेश करीत झोपडीत बांधून असलेल्या बैलावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. शेतकरी विठ्ठल श्रीरामे हे नेहमीप्रमाणे झोपडीमध्ये बैल बांधून ठेवत असतात, आज सकाळच्या सुमारास बैल सोडण्यासाठी गेले असता वाघाने बैलाला ठार केल्याचे आढळून आले. याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. घटनास्थळी वाघाचे पगमार्क सुद्धा आढळून आले आहेत.
मानेमोहाळी येथे यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. वाघाने थेट गाव परिसरात प्रवेश केल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून दहशतीत आहे. शेतीचे कामे सुरू आहेत, अशातच वाघाच्या दहशतीने शेती करायची कशी? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून वाघाच्या भीतीने आपले पाळीव प्राणी आता ठेवायचे तरी कुठे? असा देखील प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. वाघाने बैलास ठार केल्याने शेतकरी विठ्ठल श्रीरामे यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देऊन वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #tadoba #chimur #masalbk #tigerattack #neri #kolara )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here