– जिल्हावासीयांना मुक्तिपथचे आवाहन
गडविश्व
गडचिरोली, १२ सप्टेंबर : उत्साहात साजरा होणारा बळीराजाचा सण पोळा आहे. यंदाच्या पोळ्यानिमित्त दारू न पिता परंपरेनुसार ढवळ्या-पवळ्याची पूजा करीत दारूमुक्त पोळा साजरा करावा असे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे जिल्हावासीयांना करण्यात आले आहे.
बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा महत्वाचा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या निमित्ताने गावात दारू विक्री होण्याचा धोका होऊ शकतो. अनेक दिवसांपासून गावात बंद असलेली दारू पोळ्याच्या निमित्ताने सुरु होण्याची शक्यता असते. दारू सुरु झाली की, पुन्हा गावातले वातावरण बिघडते, या दिवशी दारू पिऊन अनेक जण सणाचे पावित्र्य आणि गावातील शांतता भंग करतात. गावात तंटे निर्माण होतात. यासाठीच मुक्तिपथ गावसंघटनेच्या वतीने गावात फेरी, युवकांची बैठक, ग्रा.प. समितीला माहिती देऊन दक्षता घेण्याची सूचना, मोठ्या प्रमाणात विक्री होते अशा गावांची पोलीस विभागाला माहिती व नियंत्रणासाठी माहिती, गावातील युवकांना भेटून जाणीवजागृती इत्यादी पद्धती व कृती द्वारे दारूमुक्त पोळा साजरा करण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे १२ ही तालुक्यातील गावा-गावात करण्यात आले आहे.
“दारू नको पूरण पोळी खा” “ बैल पूजा करा आनंदात सण साजरा करा” या पद्धतीचे संदेश देत जिल्हाभरातील गावागावांमध्ये जाऊन मुक्तिपथ अभियानातर्फे जनजागृती करीत दारूमुक्त पोळा चे महत्व पटवून दिले जात आहे.