– विकास खुंटला, शेतकऱ्यांचे हाल, प्रशासनाची झोप अजूनही चिरनिद्रेत…
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा (दिवाकर भोयर), दि. १७ : धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या जांभळी या गावाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणजे रांगी–जांभळी मार्ग. या मार्गावर वाहणाऱ्या नाळेवाही नाल्यावर शासनाने तब्बल पंधरा वर्षांपूर्वी पूल मंजूर केला, पण आजही त्या पुलाचे काम अपूर्ण अवस्थेतच अडकून पडले आहे.
या पुलाचे काम सुरू असताना नक्षलवादी कारवायांमुळे काम थांबवावे लागले. विशेष म्हणजे काम सुरू करणाऱ्या कंत्राटदाराची हत्या झाल्याने पुलाचे काम तिथेच थांबले आणि त्यानंतर कोणीच त्या दिशेने वळून पाहिले नाही. पुलाचे काही पिल्लर आजही उभे आहेत – त्यापैकी एक वाकलेला असून दोन्ही बाजूंनी भूक्षयाने ते अधिकच कमकुवत झाले आहेत. यामुळे आता जर हे काम पुन्हा सुरू करायचे असेल, तर पुलाची लांबी वाढवावी लागेल आणि खर्चही दुप्पट–तिप्पट होणार, असा अंदाज अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

शेती, शिक्षण, आरोग्य आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडथळा
या नाल्याच्या अडथळ्यामुळे जांभळी गावातील नागरिकांचे सामान्य जीवनच विस्कळीत झाले आहे. गावातील बहुतांश शेतजमिनी नाल्याच्या दुसऱ्या बाजूस आहेत. पावसाळ्यात या नाल्यातून शेतात जाणे म्हणजे जिवावर बेतणारा प्रवास. विद्यार्थी, महिलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने हा धोका गाठत नाला पार करावा लागतो.
शाळकरी मुले नित्यनेमाने शाळेत पोहोचण्यासाठी हा नाला पार करताना कधी कधी अर्धवट पाण्यातून चालत जातात, तर कधी पाण्याचा जोर वाढल्यास घरीच बसून राहावे लागते. यामुळे शिक्षणाचाही खोळंबा झाला आहे. वैद्यकीय गरजा असताना गावकरी वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकत नाहीत, यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता तयार, पण पूल मात्र अर्धवटच
रांगी ते जांभळी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला. पण या रस्त्यावर असलेला नाळेवाही नाल्यावर पूल नसल्याने त्या रस्त्याचा उपयोगच अपूर्ण ठरतो. नागरिकांनी ग्रामसभेतून ठराव करून केंद्र सरकारकडे निधी मिळावा म्हणून प्रस्ताव दिला. नागपूर येथील मुख्य अभियंत्यांनीही या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून कोटींमध्ये खर्चाचा प्रस्ताव तयार केला.
परंतु तो प्रस्ताव गेलाच कुठे, त्याचे काय झाले, निधी मंजूर झाला की नाही – याची माहिती प्रशासनाकडून मिळत नाही आणि गावकऱ्यांची आशा दिवसेंदिवस मावळत चालली आहे.
जर हे काम लवकर मार्गी लागले नाही, तर भविष्यात पूल कोसळण्याची किंवा अधिक मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंधरा वर्षांपासून या पुलाचे काम अर्धवटच राहिले आहे. शासनाने एकदा मंजुरी दिल्यावर इतक्या वर्षांत काम का पूर्ण झाले नाही? जबाबदार कोण? आणि प्रशासन याकडे इतक्या वर्षांनीही दुर्लक्ष का करत आहे? हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
गावकऱ्यांची अपेक्षा: “आता तरी सरकार जागं होईल का?”
यंदाच्या उन्हाळ्यात तरी सरकारने हे अडकलेले काम मार्गी लावावे अशी गावकऱ्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे. पण उन्हाळा संपत आला तरी काही हालचाल नाही. पावसाळा पुन्हा अवतीर्ण होण्याच्या तयारीत आहे, आणि गावकरी पुन्हा जीव मुठीत धरून नाला ओलांडण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.
राज्य सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा गावकऱ्यांचा संयम संपण्याची वेळ दूर नाही.