भामरागड : सडलेल्या धानाने ताडगावात आरोग्यसंकट
– नगरपंचायतीच्या बेफिकीरीवर संतप्त नागरिकांचा उद्रेक
The गडविश्व
ता.प्र / भामरागड, दि. ११ : ताडगाव येथील सबरी महामंडळाच्या धान खरेदी गोदामात सडलेल्या धानामुळे परिसरात असह्य दुर्गंध पसरून नागरिकांचे जगणे अक्षरशः उकिरड्यावर आले आहे. मागील वर्षी खरेदी केलेले धान पावसामुळे कुजले असून त्यातून निघालेले घाण पाणी गोदामालगतच्या खड्ड्यात साचले आहे. यामुळे एवढा भयानक वास सुटतो आहे की रुग्ण, दुकानदार, प्रवासी व स्थानिक रहिवासी यांचे दैनंदिन जीवन नरकयातना बनले आहे.
गोदामालगत वनकर क्लिनिक व बालाजी मेडिकल असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बसस्टॅण्डकडील मार्गही या पाण्याने अडवला असून, बाबुलाई शेतकरी उत्पादक कंपनी व कमला गॅस एजन्सीपर्यंत जाणारे नागरिक दररोज नाक दाबून प्रवास करत आहेत. पन्नासाहून अधिक रहिवासी या संकटात कोंडले गेले असून, नगरपंचायत प्रशासनाच्या बेफिकीरीवर त्यांचा संताप उसळला आहे.
“नगरपंचायतीला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणंघेणं नाही. त्यांचे लक्ष फक्त ठेकेदारकीच्या कामांवर आहे. स्वच्छता ही त्यांच्यासाठी शेवटची प्राथमिकता असावी असे स्पष्ट दिसते,” अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली.
आरोग्य विभागाकडूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने रोगराईचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. डासांची प्रचंड पैदास होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथी उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
“जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करू. झालेल्या गोंधळाची जबाबदारी नगरपंचायतीवरच असेल,” असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #bhamragad













