धानोरा येथे मधमाश्यांचा हल्ला ; अनेक नागरिक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

828

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : तालुका मुख्यालयात एका अनपेक्षित घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयापासून मज्जिदपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या झाडांवरील मधमाश्यांचे पोळे अचानक उठल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत जवळपास ५० लोक जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
ही घटना २० मार्च २०२५ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून चंपत वारलू खोबरे ( वय ८४), नरेश वामन खंडारे ( वय ४३), संदीप गजानन गुरनुले ( वय ३९ ) या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित जखमींवरही प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे नागरिक या मार्गावरून ये-जा करत असताना अचानक मधमाश्यांचे थवे आक्रमक झाले आणि त्यांनी परिसरातील लोकांना चावा घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक जखमी झाले असून त्यात वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण धानोरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून अनेक विद्यार्थी, कामगार आणि व्यापारी ये-जा करतात, त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

(#thegdv #thegadvishva #dhanoranews #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here