–विजयस्तंभ उभारून केला विजयोस्तव साजरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : तालुक्यातील मारकबोडी येथे अनेक वर्षापासून दारूविक्री बंद होती. परंतु, काही मुजोर विक्रेत्यांनी डोके वर काढत अवैध व्यवसाय सुरु केला. ही बाब लक्षात येताच महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात लढा उभारत आपल्या गावाला अवैध दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त केले. आता अनेक दिवसांपासून गावातून दारू हद्दपार झाली असून या विजयाचा उत्सव साजरा करीत ग्रामस्थांनी गावात दारूबंदीचा विजयस्तंभ उभारला आहे. यातून इतरही गावांनी प्रेरणा घेऊन आपले गाव दारूविक्रीमुक्त करण्याचे आवाहन गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूतर्फे करण्यात आले.
पूर्वी गावात अवैध दारूविक्री बंदी लागू होती. परंतु काही विक्रेत्यांनी दारूविक्रीचा व्यवसाय सुरु केल्याने व्यसनाचे प्रमाण वाढून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आले. आरोग्य, आर्थिक नुकसान होत होते. सायंकाळी दारू पिणाऱ्यांची रेलचेल राहत असल्याने महिलांना गावात फिरणे कठीण झाले होते. त्यामुळे गावात महिलांनी दारू बंदीसाठी सभा आयोजित केली. सभेत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. परंतु दारू विक्रेते मुजोर असल्याचे त्यांच्याकडून दारूबंदी संघटनेला धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडत होते. तरीसुद्धा दारूबंदी गाव संघटनेने माघार न घेता दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीचे शस्त्र उगारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शितशीवारात शोधमोहीम राबवून दारूविक्रेत्यांचे अड्डे उध्वस्त करीत लाखो रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले. सोबतच विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महिलांनी पोलिस विभागाकडे तक्रार दाखल केली.
मुक्तीपथ तालुकाचमूने सुद्धा दारूबंदी संघटनेची बैठक घेऊन त्यांना दारूबंदी टिकवण्यासाठी मार्गदर्शन केले. दारूबंदी काळाची गरज असून गाव संघटनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असले पाहिजे असे समजावून सांगितले. त्यानुसार महिलांनी पुढाकार घेत दारूविक्रेत्यांविरोधात लढा उभारून विजय मिळविला. महिलांच्या प्रयत्नातून आताच्या घडीला मारकबोडी गावात दारू विक्री बंद असून गावात वाढलेला व्यसनाचे प्रमाण कमी झाले. गावात शांतता व सुव्यवस्था टिकण्यास मदत होत आहे. गावात दारू विक्री पुन्हा सुरू होणार नाही या उद्देशाने गावातील दर्शनीस्तळी लोकसहभागातून विजयस्तंभ उभारण्यात आला. तसेच दुसरा स्तंभ गावातील चौकात लावून गावात दारू विक्री करणे, काढणे व स्वतः कडे बाळगणे गुन्हा आहे. दारू पिउन गावातील सामूहिक कार्यक्रमात उपद्रवी करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येइल, दारू पिउन महिलांची शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे निर्णय लावण्यात आले.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )