कुरखेड्यात ११ वर्षांनी MGNREGA सुरू करण्यासाठी आम आदमी पार्टीचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रात गेल्या अकरा वर्षांपासून बंद असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) पुन्हा सुरू करण्यासाठी आम आदमी पार्टी, गडचिरोलीने पुढाकार घेतला आहे. आज किसान मंगल कार्यालय, कुरखेडा येथे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली रोहयो मजुरांची बैठक पार पडली. बैठकीत जॉब कार्डधारक मजुरांनी काम मागणी अर्ज तर जॉब कार्ड नसलेल्या मजुरांनी नोंदणी अर्ज भरले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर पंचायत स्थापन झाल्यापासून MGNREGA ची कामे पूर्णपणे बंद आहेत. शासन निर्णयानुसार या क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी बंधनकारक असून अकुशल मजुरांच्या कामांसाठी शंभर टक्के आणि साहित्य खर्चासाठी पंच्याहत्तर टक्के निधी राज्य शासन पुरविते. मात्र कुरखेडा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मजुरांना स्थानिक रोजगार मिळाला नाही, शेतकऱ्यांना शेततळे, विहिरी, पाणदण रस्ते व जलस्रोत पुनरुज्जनासारख्या सुविधांपासून वंचित राहावे लागले. परिणामी मजुरांचे स्थलांतर वाढले, शेती उत्पादकतेत घट झाली आणि ग्रामीण विकास ठप्प झाला.
बैठकीत आम आदमी पार्टीने तात्काळ MGNREGA सुरू करून प्रत्येक मजुराला किमान शंभर दिवसांचा रोजगार द्यावा, शेती विकासाच्या कामांना प्राधान्य द्यावे, थकित मजुरी तात्काळ बँक खात्यात जमा करावी तसेच पारदर्शकतेसाठी सामाजिक अंकेक्षण आणि तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या मांडल्या.
यावेळी जिल्हा सचिव अमृत मेहेर, उपाध्यक्ष राजू मडावी, संघटक ताहिर शेख, सहसंघटक चेतन गहाणे, कोषाध्यक्ष इरफान पठाण, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने मजूर उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी म्हणाले की, “शेतकरी व मजुरांवरील अकरा वर्षांचा अन्याय दूर करण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध असून कुरखेड्यात रोजगार हमी योजना सुरू करणे हा आर्थिक स्थैर्याचा प्रश्न आहे.” तर राजू मडावी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शेती सुविधांची गरज अधोरेखित केली. ताहिर शेख व चेतन गहाणे यांनी मजुरांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.
आम आदमी पार्टीने नगर पंचायत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली असून येत्या काही दिवसांत निधी प्रस्ताव सादर करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पुढाकारामुळे कुरखेड्यातील रोजगार निर्मिती, शेती विकास आणि ग्रामीण समृद्धीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













