नाळेवाहीचा अर्धवट पूल ठरतोय विकासातील अडथळा; १५ वर्षांपासून जांभळी परिसराची कोंडी

5

नाळेवाहीचा अर्धवट पूल ठरतोय विकासातील अडथळा; १५ वर्षांपासून जांभळी परिसराची कोंडी
– पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो; विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि.१८ : आरमोरी तालुक्यातील जांभळी ते धानोरा तालुक्यातील रांगी मार्गावरील नाळेवाही नाल्यावरील अर्धवट पुलाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. या पुलाअभावी जांभळी, दवंडी आणि परिसरातील गावांचा विकास खुंटला असून नागरिकांना आजही दळणवळणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास गावांचा संपर्क तुटतो. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी तसेच रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो.

१५ वर्षांपासून पुलाचे काम अपूर्णच

नाळेवाही नाल्यावरील पुलाला सुमारे १५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र, दीड दशकाचा कालावधी उलटूनही पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. हा पूल पूर्ण झाला असता तर जांभळी परिसरातील दुर्गम गावांची वाहतूक सुरळीत झाली असती. एसटी बसची सुविधा उपलब्ध होण्यासह नागरिकांना रांगी व इतर गावांशी नियमित संपर्क ठेवणे शक्य झाले असते. मात्र, अर्धवट पुलामुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला खीळ बसली आहे.

विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे शक्य होत नाही. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत त्यांना घरीच थांबावे लागते. परिणामी, त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणार कोण, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीकामे

जांभळी परिसरातील अनेक शेतजमिनी नाल्याच्या पलीकडे आहेत. नांगरणी, रोवणी, फवारणी आणि इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार नाला ओलांडावा लागतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही शेतीकामासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

२०२२ मध्ये पुरात अडकले होते सुमारे १०० नागरिक

२०२२ च्या पावसाळ्यात नाळेवाही नाल्याला मोठा पूर आल्याने सुमारे १०० नागरिक अडकले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी दोर, काठ्या आणि उपलब्ध साहित्याच्या मदतीने जीव धोक्यात घालून नागरिकांची सुटका केली होती. एवढी गंभीर घटना घडूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

आतातरी प्रशासनाला जाग येणार का?

पुलाअभावी परिसरातील नागरिकांना व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि आरोग्यविषयक सुविधांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजारी रुग्णांना वेळेवर उपचारासाठी नेणे कठीण होते, तर पावसाळ्यात संपूर्ण परिसराचा संपर्क तुटतो. परिणामी, जांभळी आणि दवंडी परिसरातील नागरिकांना दरवर्षी त्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून पुलाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांच्या पदरी अद्याप निराशाच पडली आहे. संबंधित विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन नाळेवाही पुलाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार की जांभळी परिसरातील नागरिकांची ही दळणवळणाची कोंडी कायम राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Dhanora #Jambhali #NalevahiBridge #RuralDevelopment #RoadConnectivity #PublicIssues #MaharashtraNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here