गडचिरोली, कुरखेडा, आरमोरीच्या शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नामकरण; राज्यातील ५१ विद्यालयांना नवी ओळख

5

गडचिरोली, कुरखेडा, आरमोरीच्या शासकीय तांत्रिक विद्यालयांचे नामकरण; राज्यातील ५१ विद्यालयांना नवी ओळख
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : राज्यातील ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, कुरखेडा आणि आरमोरी येथील तीन शासकीय तांत्रिक विद्यालयांचाही समावेश आहे. यापुढे ही विद्यालये नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. यासंदर्भात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने ६ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार गडचिरोली येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण डॉ. नारायण खाटी शासकीय तांत्रिक विद्यालय, गडचिरोली, कुरखेडा येथील विद्यालयाचे पारिजातक बावनथडे शासकीय तांत्रिक विद्यालय, कुरखेडा, तर आरमोरी येथील विद्यालयाचे वामनराव वनमाळी शासकीय तांत्रिक विद्यालय, आरमोरी असे करण्यात आले आहे.

राज्यात सध्या एकूण १६२ शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात तांत्रिक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने इयत्ता नववी व दहावीच्या स्तरावर बहुकौशल्ययुक्त पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम राबविले जातात.

शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामकरणाचा निर्णय घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कोकण व नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराला २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता कोकण व नाशिक विभाग वगळता राज्यातील उर्वरित विभागांमधील ५१ विद्यालयांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा प्रकारे दोन टप्प्यांत राज्यातील एकूण ७६ शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी नावे मिळाली आहेत. या निर्णयामुळे विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावाने शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी ओळख मिळणार आहे. शासन निर्णयानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला देण्यात आले आहेत.
शासन निर्णय – 202611061712245903
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Maharashtra #GovernmentTechnicalSchools #SchoolRenaming #TechnicalEducation #SkillDevelopment #DrNarayanKhati #KurKheda #Armori #EducationNews #MaharashtraGovernment #TheGadvishva #GadchiroliNews #LatestNews #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here