
ना हरकत प्रमाणपत्रासाठी लाच मागितली : ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०९ : बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक अशा दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाळ्यात ओढले. यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई ६ नोव्हेंबर रोजी वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे करण्यात आली.
पांडुरंग निळकंठ पेंदे (४८), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत नागरी आणि प्रणव सुधाकरराव बक्षी (५१), प्रशासक ग्रामपंचायत नागरी तथा विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती वरोरा अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार आणि त्यांच्या भावाने नागरी येथील सर्वे क्रमांक १९८/२ मधील ०.८१ हेक्टर शेतजमिनीवर बार अँड रेस्टॉरंट उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे अर्ज केला होता. यासाठी ग्रामपंचायत नागरीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी पेंदे आणि बक्षी यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार नागपूर येथील पोलीस हवालदार प्रशील झुरमुरे यांनी २ नोव्हेंबर रोजी एसीबीकडे केली.
तक्रारीच्या आधारे एसीबीने शासकीय पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली. ४ व ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान दोन्ही आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. खांबाडा येथील नागपूर-चंद्रपूर मार्गावर रहीम पानठेल्याजवळ ग्रामपंचायत अधिकारी पेंदे यांनी तक्रारदाराकडून तीन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात प्रशासक बक्षी यांनाही ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान तीन लाख रुपयांची लाच रक्कम, दोन्ही आरोपींचे मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या सुधारित कलम ७ अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी फिर्याद दिली. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













