धानोरा पोलिसांचा अवैध दारूभट्टीवर छापा; ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त
– वानरचुवा येथील जंगलात कारवाई; ४७० लिटर मोहफुलाचा सडवा व दारू जप्त
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०७ : तालुक्यातील वानरचुवा येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहफुलाच्या दारूभट्टीवर धानोरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० ते २ वाजताच्या दरम्यान वानरचुवा गावाच्या दक्षिणेकडील जंगल परिसरातील नाल्याजवळ ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुयश कुमार सिंग आणि पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने दारूभट्टीवर छापा टाकला.
यावेळी प्रमोद अंताराम हलामी (रा. वानरचुवा, ता. आरमोरी) हा मोहफुलाची अवैध दारू तयार करण्यासाठी हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन २०० लिटर क्षमतेच्या ड्रममधील एकूण ४०० लिटर मोहफुलाचा सडवा, दोन प्लास्टिक कॅनमधील ७० लिटर हातभट्टीची दारू तसेच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी व इतर साहित्य असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका भेंडारकर, पोलीस हवालदार मारुती मोहदेकर, पोलीस शिपाई पंकज नाकतोडे आणि प्रमोद गौरकर यांच्या पथकाने केली.













