गडचिरोलीत दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात; लाच मागितल्यास १०६४ वर करा तक्रार

2

गडचिरोलीत दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात; लाच मागितल्यास १०६४ वर करा तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली कार्यालयाच्या वतीने सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ हे ब्रीदवाक्य घेऊन १ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विभागाच्या कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.
‘भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करू, लोकशाहीचा साकार करू’ ही संकल्पना घेऊन सप्ताहादरम्यान शासकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी चर्चासत्रे, व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच पथनाट्ये, विविध स्पर्धा, पत्रके, बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागात ग्रामसभांच्या माध्यमातूनही नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरूक केले जाणार आहे.
सप्ताहाच्या प्रारंभी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक व टी-पॉइंट तसेच कोटगल आणि नवेगाव परिसरात भ्रष्टाचारविरोधी बॅनर लावण्यात आले.
दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच शासकीय मानधन घेणाऱ्या संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी किंवा त्यांच्या अवैध मालमत्तेबाबत माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा मोबाईल क्रमांक ७५८८०४१०६४ यावर संपर्क साधावा. तसेच ०७१३२-२९५०२० या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांनी केले.
कार्यालयात झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे, पोलीस निरीक्षक किरण बगाटे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here