बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी धानोऱ्यात जनजागृती; विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याचे धडे

2

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी धानोऱ्यात जनजागृती; विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याचे धडे
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २४ : बालकांची सुरक्षितता, त्यांचे मूलभूत अधिकार आणि लैंगिक अत्याचारापासून कायदेशीर संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथे ‘बालकांचे अधिकार, संविधानाचे महत्त्व आणि पोक्सो कायदा’ या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक ॲड. लोकेश राजगडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, बालकांचे मूलभूत अधिकार तसेच पोक्सो कायद्याच्या विविध तरतुदींची माहिती सोप्या भाषेत दिली. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून बालकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
बालकांना लैंगिक शोषणापासून संरक्षण देण्यासाठी २०१२ मध्ये पोक्सो कायदा लागू करण्यात आला. या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, लैंगिक अत्याचाराचे विविध प्रकार आणि अशा घटनांची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याचे महत्त्व ॲड. राजगडे यांनी स्पष्ट केले. अनुचित प्रसंग घडल्यास घाबरून न जाता तत्काळ विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि आपत्कालीन मदत क्रमांक ११२ यांची माहिती देण्यात आली. संकटसमयी या क्रमांकांचा वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे होते. यावेळी ॲड. एल. राजगडे, पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, व्ही. एम. बुरमवार, व्ही. के. भोगे आणि श्रीमती कीर्ती सिंगरूपवार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. रश्मी डोके यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here