गडचिरोलीत ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये; मालेवाडा ते जिमलगट्ट्यापर्यंत महसूल यंत्रणेचा विस्तार

89

गडचिरोलीत ६ नवीन अपर तहसीलदार कार्यालये; मालेवाडा ते जिमलगट्ट्यापर्यंत महसूल यंत्रणेचा विस्तार
The गडविश्व
गडचिरोली, दि.२४ : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जवळून मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी दिली आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महसूल विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये नवीन महसूल कार्यालये सुरू होणार आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, आरमोरी तालुक्यातील वैरागड, धानोरा तालुक्यातील पेंढरी, सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर आणि अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

कोणत्या कार्यालयाच्या अखत्यारित कोणते महसूल मंडळ?

कुरखेडा – अपर तहसीलदार कार्यालय, मालेवाडा
महसूल मंडळे : मालेवाडा, पुराडा — २ मंडळे.

आरमोरी – अपर तहसीलदार कार्यालय, वैरागड
महसूल मंडळे : वैरागड, पिसेवडधा — २ मंडळे.

धानोरा – अपर तहसीलदार कार्यालय, पेंढरी
महसूल मंडळे : पेंढरी, गट्टा, कारवाफा — ३ मंडळे.

सिरोंचा – अपर तहसीलदार कार्यालय, आसरअल्ली
महसूल मंडळे : आसरअल्ली, पैंटीपाका — २ मंडळे.

एटापल्ली – अपर तहसीलदार कार्यालय, कसनसूर
महसूल मंडळे : कसनसूर, हालेवारा, जारावंडी, कोटमी — ४ मंडळे.

अहेरी – अपर तहसीलदार कार्यालय, जिमलगट्टा
महसूल मंडळे : जिमलगट्टा, कमलापूर — २ मंडळे.

नवीन कार्यालयांसाठी संबंधित महसूल मंडळांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना महसूल कामकाजासाठी मुख्य तहसील कार्यालयापर्यंत कराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होण्यास मदत होणार आहे.

शासन निर्णयानुसार या कार्यालयांमार्फत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत संबंधित क्षेत्रासाठी तहसीलदारांकडील अधिकार व कर्तव्ये बजावली जाणार आहेत. मात्र, संपूर्ण तालुक्याशी संबंधित इतर कामकाजाचे अधिकार मूळ तहसील कार्यालयाकडेच राहणार आहेत.
सध्या कार्यालयांसाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, कायमस्वरूपी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे राबविली जाणार आहे.
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी महसूल सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here