
सीआरपीएफ जवानांच्या श्रमदानातून ग्रामीण रुग्णालय परिसर चकाचक
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २३ : ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ अंतर्गत ११३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) धानोरा ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून रुग्णालय परिसरातील कचरा, झुडपे व गवत हटवून परिसर स्वच्छ व कचरामुक्त करण्यात आला.
११३ बटालियन सीआरपीएफचे कमांडंट अजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. जवानांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत ग्रामीण रुग्णालयाचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे रुग्णालय परिसराला स्वच्छ आणि टापटीप स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी कमांडंट अजय सिंह यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसरात कचरा न टाकणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे आणि उघड्यावर शौचास जाणे टाळण्याचे आवाहन केले. तसेच गुटखा, विडी आणि सिगारेटच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देत नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या स्वच्छता मोहिमेत सीआरपीएफ अधिकारी व जवानांसह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायत धानोरा कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास ११३ बटालियनचे सेकंड-इन-कमांडिंग अधिकारी एम. आर. अन्सारी, डेप्युटी कमांडंट दलबीर सिंह, डॉ. बागराज धुर्वे (एमएस), डॉ. नितीन बांबोडे (एमओ) यांच्यासह रुग्णालय कर्मचारी, अधिनस्थ अधिकारी, जवान, नगरपंचायत कर्मचारी आणि धानोरा येथील नागरिक उपस्थित होते.













