वनहक्क दाव्यांना गती देण्यासाठी कुरखेड्यात विशेष कार्यशाळा
– ग्रामस्तरीय समित्यांना तांत्रिक मार्गदर्शन; प्रलंबित दावे निकाली काढण्याचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.२३ : आदिवासी व पारंपरिक वननिवासी बांधवांच्या वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांसाठी एकदिवसीय विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास मसराम होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रामदास मसराम यांनी वनहक्क कायदा हा आदिवासी व पारंपरिक वननिवासी नागरिकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक वनहक्कांचे प्रलंबित दावे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेला कुरखेडा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी किरण वाघजकर आणि तहसीलदार शशिकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी वाघजकर यांनी वनहक्क कायद्यातील तांत्रिक बाबी, दाव्यांची पडताळणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तहसीलदार शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. वनहक्क दावे सादर करताना किंवा त्यांची प्रक्रिया पूर्ण करताना समित्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तांत्रिक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यशाळेत तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांचे अध्यक्ष व सचिव, तलाठी, ग्रामसेवक तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. यावेळी समिती सदस्यांनी दाव्यांशी संबंधित विविध अडचणी व प्रश्न मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन करून वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्याबाबत मार्गदर्शन केले.













