Gadchiroli News: आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नंदु नरोटेंची कठोर कारवाईची मागणी

8

Gadchiroli News: आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नंदु नरोटेंची कठोर कारवाईची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या दर्जाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निकृष्ट अन्नधान्याची तातडीने तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूरचे सरसेनापती नंदु नरोटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, राज्यातील ५८४ शासकीय आश्रमशाळांना केंद्रीय भंडार, मुंबईमार्फत पेटी कंत्राटदारांच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. तर सुमारे ५९० अनुदानित आश्रमशाळांमध्ये संस्थाचालकांकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची अन्न व औषध प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी करावी. अन्नधान्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करावी आणि नमुने निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नरोटे यांनी केली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये जाऊन तपासणी करावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
हे निवेदन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना देण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी विलास नरोटे, जिल्हाध्यक्ष मोहन पुराम, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पेंदाम, बाळासाहेब ठाकरे (वडसा), विलास कन्नाके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here