गोंडवाना विद्यापीठातील भूपतींची नियुक्ती कायम ठेवा; शेकापची शासनाकडे मागणी
– राजकीय दबावाला बळी न पडता आत्मसमर्पण धोरणानुसार दिलेला शब्द पाळण्याचे रामदास जराते यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गोंडवाना विद्यापीठाच्या एकल उपक्रमाचे समन्वयक म्हणून आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुलू वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांची करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी केली आहे. काही संघटनांकडून नियुक्ती रद्द करण्याची मागणी होत असताना, हा निर्णय राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी पडून घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात जराते यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले आहे. गडचिरोलीसह देशभरात आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन हक्कांसाठी नक्षल चळवळ सक्रिय होती. मात्र, या सशस्त्र संघर्षामुळे पोलीस जवान, निरपराध नागरिक तसेच आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. नक्षलवादाचा मार्ग धोकादायक असला तरी मागील काही वर्षांत अनेक नक्षल कार्यकर्त्यांनी शस्त्राचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे ही प्रक्रिया शक्य झाली, असे जराते यांनी नमूद केले.
भूपती यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना सन्मानाने पुनर्वसनाचे जीवन जगण्याचा विश्वास शासनाने दिला होता. त्याच धोरणाचा भाग म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमात समन्वयक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करण्याऐवजी शासनाने आत्मसमर्पण धोरणांतर्गत दिलेला विश्वास कायम ठेवावा, अशी भूमिका जराते यांनी मांडली.
विरोधकांवर वसुलीचे गंभीर आरोप
भूपती यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या काही घटकांवर जराते यांनी गंभीर आरोप केले. नक्षलवाद्यांशी जवळीक असल्याचे भासवून तेंदूपत्ता, बांबू आणि बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांकडून कथित वसुली करणारे घटक आता नक्षल चळवळ कमजोर झाल्याने अस्वस्थ असल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामसभांवर प्रभाव कायम ठेवून कमिशनखोरी आणि नेतागिरी सुरू ठेवू इच्छिणाऱ्यांकडून नियुक्तीला विरोध होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भूपती हे ब्राह्मण समाजातील असूनही त्यांनी मध्य भारतातील आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात संघटित करून सुमारे चार दशके संघर्ष केला. त्यांचा संघर्षाचा मार्ग चुकीचा असला तरी जल, जंगल, जमीन, ग्रामसभा, पेसा आणि वनाधिकाराच्या प्रश्नांशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या संबंधित उपक्रमासाठी त्यांचा अनुभव आणि अभ्यास उपयोगी ठरू शकतो, असा दावा जराते यांनी केला.
आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नव्या पिढीला दिशा मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करत भूपती उर्फ मल्लोजुलू वेणुगोपाल राव यांची नियुक्ती कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावामुळे रद्द करू नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













