एसटी धावतेय की धोका? अहेरी आगाराच्या बसचे पुन्हा चाक निखळले

19

एसटी धावतेय की धोका? अहेरी आगाराच्या बसचे पुन्हा चाक निखळले
– २० दिवसांत दुसरी घटना; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : अहेरी-कमलापूर मार्गावर धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची घटना गुरुवारी (३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. चाक निखळल्याने बसचा ताबा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
अहेरी आगारातील बसच्या तांत्रिक देखभालीचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या २० दिवसांत धावत्या बसचे चाक निखळण्याची ही दुसरी घटना असल्याने आगाराच्या देखभाल व्यवस्थेबाबत प्रवाशांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

१३ ऑगस्टला मेळारामजवळही थरार

यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी मेळारामजवळ अहेरी आगाराच्या धावत्या एसटी बसचे चाक निखळले होते. त्या वेळी बसमध्ये २८ प्रवासी होते. निखळलेले चाक सुमारे १०० फूट अंतरावर जाऊन पडले होते. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली होती.
या घटनेची पुनरावृत्ती अवघ्या काही दिवसांत झाल्याने बस रस्त्यावर धावण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक तपासणीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी बस बाहेर काढण्यापूर्वी चाक, नट-बोल्ट, टायर तसेच अन्य महत्त्वाच्या यांत्रिक घटकांची तपासणी करणे अपेक्षित असते. मात्र, चाक निखळण्याच्या दोन घटनांमुळे ही तपासणी नेमकी कोणत्या पद्धतीने आणि कितपत गांभीर्याने केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांसाठी एसटी सेवा ही दळणवळणाची प्रमुख कडी आहे. त्यामुळे तांत्रिक दोष असलेल्या बस प्रवासी सेवेत धावणे गंभीर बाब मानली जात आहे. एखाद्या वेळी चालकाला बस नियंत्रणात आणण्यात अपयश आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बसची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची मागणी

अहेरी आगारातील बसची तातडीने सखोल तांत्रिक तपासणी करावी, चाक व इतर महत्त्वाच्या यांत्रिक भागांची तपासणी करून दोषपूर्ण वाहने सेवेतून बाजूला काढावीत, तसेच चाक निखळण्याच्या घटनांची चौकशी करून त्यामागील कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असून, एसटी प्रशासनाने आता केवळ घटनांनंतर उपाययोजना न करता प्रतिबंधात्मक देखभालीवर भर देण्याची गरज आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #aherinews #stbus #aheribus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here