जुन्या बसांचा फटका; बेलगावात एसटी पंचर, प्रवासी त्रस्त
– वारंवारच्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचा खोळंबा, सुस्थितीतील बस देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ३१ : गडचिरोली आगारातून सुटलेली गडचिरोली–आंबेशिवनी–अमिर्झा–मौशीखांब मार्गावरील एसटी बस बेलगाव येथे पोहोचताच पंचर झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. बसमध्ये बिघाड झाल्याने पुढील प्रवासासाठी प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला.
या मार्गावर एसटी महामंडळाकडून जुन्या व जीर्ण अवस्थेतील बस चालविल्या जात असल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी एसटी बस ही प्रवासाचे प्रमुख साधन असताना बससेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांच्या दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवेचा आढावा घेऊन सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्यावी, तसेच वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.













