जपतलाईत एका दिवसात कारवाई, मग कोठी–कोरनार पुलासाठी १२ दिवस का? आजाद समाज पार्टीचा सवाल

19

जपतलाईत एका दिवसात कारवाई, मग कोठी–कोरनार पुलासाठी १२ दिवस का? आजाद समाज पार्टीचा सवाल
– पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा; अधीक्षक अभियंत्यांना १५ ऑगस्टपूर्वी निलंबित करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : एटापल्ली तालुक्यातील कोठी–कोरनार येथील पूल २९ जुलै रोजी पुराच्या पाण्यात कोसळून १२ दिवस उलटले, तरी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल आजाद समाज पार्टीने पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी उद्घाटन झालेला पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांना १५ ऑगस्टपूर्वी निलंबित करावे, अशी मागणीही पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुढे बोलतांना ते म्हणाले जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित शाळेवर एका दिवसात कारवाई करण्यात आली. मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पूल कोसळल्यानंतर १२ दिवस उलटूनही कारवाई का नाही, असा प्रश्न बन्सोड यांनी उपस्थित केला. दोषींची पाठराखण कोण आणि का करत आहे, असा सवालही त्यांनी केला.
कोठी–कोरनार पुलाची मूळ मंजूर किंमत सुमारे ४ कोटी ९ लाख ७० हजार रुपये होती. मात्र, डिझाइन बदलाच्या नावाखाली कामाचा खर्च जवळपास ८ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. डिझाइनमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले, सुधारित अंदाजपत्रक कोणी मंजूर केले आणि वाढीव निधीचा वापर कुठे झाला, याची चौकशी करून कामाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

५५० कोटींच्या कामांवरही प्रश्नचिन्ह

अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यकाळात सुमारे ५५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही आजाद समाज पार्टीने केला. जिल्ह्यातील विविध रस्ते व पुलांच्या निकृष्ट कामांबाबत यापूर्वी तक्रारी केल्याचे बन्सोड यांनी सांगितले. नाळेकल येथील पुलिया तसेच एटापल्ली तालुक्यातील ताडगाव रस्त्यावरील बंडिया नाल्यावरील पुलाच्या कामाचा त्यांनी संदर्भ दिला.
गडचिरोलीसह नागपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार एका अधीक्षक अभियंत्यांकडे असल्याने दुर्गम जिल्ह्यातील कामांवर पुरेसे नियंत्रण राहते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. १५ ऑगस्टपूर्वी अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई न झाल्यास १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेला आझाद पार्टीचे पदाधिकारी विनोद मडावी, शेखर काटेगे, किसन उसेंडी, डॉ. प्रशांत, हंसराज उराडे, नागसेन खोब्रागडे, वनिता उसेंडी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here