कुरखेडा : सती नदीतील आंघोळीचा बेत ठरला काळ, तीन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

35

कुरखेडा : सती नदीतील आंघोळीचा बेत ठरला काळ; तीन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
– चौथ्या मुलाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव,खेडगाव परिसरात शोककळा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १ : तालुक्यातील खेडगाव येथे सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १) दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली. चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखून नदीबाहेर येत स्थानिक नागरिक व मच्छीमारांना घटनेची माहिती दिल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे खेडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.प्राथमिक माहितीनुसार, चार अल्पवयीन मुले सती नदीत आंघोळीसाठी गेली होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे मुले खोल पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय १२), कुनाल नरेश दुधकवर (वय ११) आणि कोहित युवराज सराटे (वय १२) यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबविण्यात आले असून, पंचनामा व अन्य आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार तिघांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याची माहिती कुरखेडा तहसीलदारांनी दिली आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव व अन्य जलस्रोतांतील पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढली असून, अशा ठिकाणी जाणे जीवघेणे ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
पावसाळ्यात नदी, नाले, तलाव, बंधारे, खाणीतील पाणीसाठे व इतर जलाशयांमध्ये पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी जाऊ नये. तसेच पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत पायी अथवा वाहनाने पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याचा वेग व खोलीचा अचूक अंदाज येत नसल्याने दुर्घटनेचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
विशेषतः पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना नदी, नाले व इतर धोकादायक जलस्रोतांपासून दूर ठेवावे, असेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Kurkheda #SatiRiver #Khedgaon #TragicIncident #ChildDrowning #ThreeChildrenDead #RiverAccident #HeavyRainfall #FloodAlert #StaySafe #ChildSafety #GadchiroliNews #MaharashtraNews #TheGadVishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here