रस्त्यात पुन्हा ट्रक रुतले ; २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवाशांची चार तासांची फरफट
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २८ : धानोरा–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या आणि संथ गतीने सुरू असलेल्या रस्ते कामाचा फटका नागरिकांना पुन्हा एकदा बसला. मेढा फाट्याजवळ सोमवारी (२७ जुलै) दोन अवजड ट्रक चिखलात रुतल्याने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, अनेक प्रवाशांना तब्बल चार तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गाचे काम सुरू असले तरी त्याची गती अत्यंत संथ आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण झाले आहे. चिखलामुळे अवजड वाहने वारंवार फसत असल्याने वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून धानोरा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. अनेक वाहनचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संताप
धानोरा–गडचिरोली महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहतूक धोकादायक बनली असून संबंधित विभागाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तातडीने उपाययोजनांची मागणी
पावसाळ्यात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













