सीमेवर देशरक्षण करताना वीरमरण ; BSF जवान सुरेश आंबाडारे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

55

सीमेवर देशरक्षण करताना वीरमरण ; BSF जवान सुरेश आंबाडारे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : देशाच्या सीमांचे रक्षण करताना कर्तव्य बजावत वीरमरण आलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान सुरेश आंबाडारे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. “भारत माता की जय” आणि “शहीद सुरेश आंबाडारे अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण वातावरणात या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.
कर्तव्यनिष्ठ आणि देशसेवेसाठी समर्पित असलेल्या सुरेश आंबाडारे यांचे सेवेदरम्यान वीरमरण झाल्याची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. कुटुंबीयांसह ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शहीद जवानाचे पार्थिव मूळ गावी दाखल होताच नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
अंत्यसंस्कारावेळी बीएसएफच्या विशेष तुकडीने हवेत फैरी झाडून तसेच शस्त्रे उलटी करून शहीद जवानाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत लष्करी मानवंदना दिली. यावेळी प्रशासनातील अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बीएसएफचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तालुका पत्रकार संघाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरेश आंबाडारे यांच्या शौर्यामुळे संपूर्ण परिसरात अभिमानासह हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या बलिदानाची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here