उद्या गडचिरोलीत कारगिल विजय दिन; शहीद जवानांना कारगिल स्मारकात मानवंदना

41

उद्या गडचिरोलीत कारगिल विजय दिन; शहीद जवानांना कारगिल स्मारकात मानवंदना
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी २७ वा कारगिल विजय दिवस रविवार, दि. २६ जुलै रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोलीतील कारगिल स्मारक हे जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रेरणास्थान मानले जाते. या स्मारकाच्या उभारणीसाठी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांनी सन २००० पासून तब्बल २२ वर्षे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून अथक प्रयत्न केले. त्यांच्या संघर्षानंतर २०२२ मध्ये हे स्मारक साकार झाले. विशेष म्हणजे, मागील २६ वर्षांपासून कारगिल विजय दिनानिमित्त या ठिकाणी शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता इंदिरा (गांधी) चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कारगिल विजय रॅलीने होईल. रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यानंतर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना दिली जाईल. त्यानंतर वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक हिम्मतसिंह बेडला, ले. कर्नल रामनाथ स्वामी, कृष्णा रेड्डी, रतिकांता साहू, नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, होमराज डोनाळकर तसेच कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वीर जवानांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन कारगिल स्मारक समिती, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना आणि समस्त आजी-माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here