धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठे खिंडार ; नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसह ११ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

164

धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठे खिंडार ; नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसह ११ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
– विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांच्या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगराध्यक्षा, उपाध्यक्ष ललित बरछा यांच्यासह एकूण ११ नगरसेवकांनी नागपूर येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
या पक्षप्रवेशाचे विशेष म्हणजे भाजपमध्ये दाखल झालेले बहुतांश लोकप्रतिनिधी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या सामूहिक पक्षांतरामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
धानोरा तालुक्यात ललित बरछा यांची ओळख काँग्रेसची संघटना मजबूत करणारे, आक्रमक भूमिका घेणारे आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणारे नेते अशी होती. यापूर्वी काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी त्यांनी पक्षांतरावर कठोर टीका केली होती. मात्र आता त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसच्या अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घडामोडीमुळे धानोरा नगरपंचायतीतील काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धानोरा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असल्याने या पक्षांतराचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
गत विधानसभा निवडणुकीत धानोरा व गडचिरोली तालुक्यांत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली होती. मात्र अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यांतील भाजपच्या आघाडीच्या जोरावर डॉ. मिलिंद नरोटे आमदार म्हणून निवडून आले. आता धानोरा तालुक्यातही भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे चित्र दिसत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर धानोरा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेससमोर नव्याने संघटन उभारणीचे मोठे आव्हान उभे राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश’ : ललित बरछा

या पक्षप्रवेशाबाबत संपर्क साधला असता नगरपंचायतीचे उपाध्यक्ष ललित बरछा यांनी, “धानोरा शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे स्पष्ट केले.
या सामूहिक पक्षप्रवेशामुळे धानोरा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये कितपत उमटतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here