दर्शनावरून परतताना काळाचा घाला ; पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू
The गडविश्व
सोलापूर, दि. १४ : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला असून पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील राजनी गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजनी गावातील 14 जणांचा समूह म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची पिकअप वॅन म्हसवड-तांदुळवाडी मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहनातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य सुरू केले. उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #SolapurAccident #Malshiras #RanjaniVillage #PickupVanAccident #WellAccident #RoadAccident #MaharashtraNews #BreakingNews #SiddhanathTemple #Pandharpur #SolapurNews #TragicIncident #AccidentNews #RescueOperation #Maharashtra














