गडचिरोलीतील रास्त भाव दुकानांत निकृष्ट धान्याचा पुरवठा? चौकशी करून कारवाईची मागणी

15

गडचिरोलीतील रास्त भाव दुकानांत निकृष्ट धान्याचा पुरवठा? चौकशी करून कारवाईची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणाऱ्या गहू व तांदळाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धान्याच्या गुणवत्तेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून धान्य वितरण होत असले तरी धान्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक लाभार्थ्यांना तुटलेले, रंग बदललेले तसेच वापरण्यास अयोग्य धान्य मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र अशा तक्रारींची प्रत्यक्ष तपासणी न करता केवळ कागदोपत्री कार्यवाही केली जात असल्याने संबंधितांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचे वलके यांनी म्हटले आहे.
रास्त भाव दुकानांमध्ये वितरित होणाऱ्या धान्याची तपासणी करताना लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पावतीवर नमूद लॉट क्रमांक, दर्जा आणि दरानुसार धान्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. तसेच निकृष्ट धान्य पुरवठा करणारे कंत्राटदार, गोदाम व्यवस्थापन आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गरीब व गरजू नागरिकांच्या अन्नसुरक्षेशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत जिल्हास्तरीय विशेष तपासणी मोहीम राबवावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here