कोरची–कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा ; तीन ट्रक फसल्याने तासन्तास जाम
– भर उन्हात प्रवाशांचे हाल
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. २५ : कोरची–कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (२४ मे) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या कडेला योग्य प्रकारे मुरमाचा भराव न केल्याने सलग तीन जड ट्रक रस्त्यालगत फसल्याची घटना घडली. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प राहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्राला छत्तीसगड राज्याशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या महामार्गावर दिवस-रात्र मालवाहतूक, प्रवासी वाहने, खासगी बस, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या कडेला आवश्यक दुरुस्ती आणि मजबूत मुरमाचा भराव न झाल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास एक जड वाहन रस्त्याच्या कडेला अडचणीत आले. त्यानंतर मागून येणारे आणखी दोन ट्रक रस्ता अरुंद असल्याने बाजूला घेताना फसले. काही वेळातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाला.
या कोंडीमुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना भर उन्हात वाहनांमध्येच अडकून राहावे लागले. उकाड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेक प्रवासी वाहने तासन्तास मार्गावर अडकून पडल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर अनेक वाहन चालकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. “रस्त्याच्या कडेला वेळेत मुरमाचा भराव करण्यात आला असता, तर ही परिस्थिती टाळता आली असती,” अशी प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच बेडगाव येथील प्रभारी अधिकारी दिनेश खोटले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले असून काही भागांतील मुरम वाहून गेल्याने रस्ता कमकुवत झाला आहे. त्यामुळे विशेषतः जड वाहनांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.
दरम्यान, पावसाळा तोंडावर असताना या महामार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कडेला मजबूत भराव, धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती आणि जड वाहनांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारण्याची मागणी आता नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.














