धामणगाव (विद्यामंदिर) आगीत होरपळले ; ५० घरे जळाली, अर्धे गाव उद्ध्वस्त

232

धामणगाव (विद्यामंदिर) आगीत होरपळले ; ५० घरे जळाली, अर्धे गाव उद्ध्वस्त
The गडविश्व
भिवापूर (नागपूर), दि. ०२ : भिवापूर तालुक्यातील धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत अर्ध्याहून अधिक गाव जळून खाक झाले. या भीषण दुर्घटनेत सुमारे ५० घरे, गोठे, धान्यसाठे आणि घरगुती साहित्य भस्मसात झाले असून अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र गावभर हंबरडा आणि आक्रोशाचे चित्र पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावालगतच्या शेतात कुणीतरी कचरा जाळण्यासाठी वणवा पेटवला होता. दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक रौद्र रूप धारण केले. जोरदार वाऱ्यामुळे उडालेल्या ठिणग्या शेतालगत असलेल्या रुपेश रामटेके यांच्या घरावर पडल्या आणि काही क्षणांत घर पेटून उठले.
यानंतर आग वेगाने शेजारील घरांकडे पसरली. उन्हाळ्यामुळे वाळलेला पालापाचोळा आणि घरांची जवळीक यामुळे काही मिनिटांत संपूर्ण वस्ती आगीच्या विळख्यात सापडली.

‘घर वाचवा… जनावरे वाचवा…’ गाव हादरले

अचानक उठलेल्या ज्वाळांमुळे गावात एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी बादल्या, पाणी आणि मिळेल त्या साहित्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्वाळांचा वेग इतका प्रचंड होता की सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
‘घर वाचवा… जनावरे वाचवा…’ अशा किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान या आगीत दोन ते चार मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती आहे. अनेकांचे धान्यसाठे, कपडे, भांडी, फर्निचर, शेतीसाहित्य आणि संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
कुणाची सायकल, कुणाची दुचाकी तर कुणाचा उदरनिर्वाहाचा आधार असलेला ऑटो रिक्षा लोखंडाच्या सांगाड्यात बदलला. अनेक कुटुंबांचे सर्वस्व काही तासांत संपले.

चार दिशांनी धावले अग्निशमन दल

घटनेची तीव्रता लक्षात घेऊन भिवापूर, उमरेड, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी, चिमूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या धामणगावकडे रवाना करण्यात आल्या. मात्र मदतपथके घटनास्थळी पोहोचेपर्यंत निम्म्या गावाची राख झाली होती.
रात्री साडेनऊ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू राहिले. त्यानंतर आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेत धीर दिला.
या भीषण आगीत सुमारे ५० संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गावकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत, निवारा, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #DhamangaonFire #NagpurNews #VillageFire #BreakingNews #Bhiwapur #MaharashtraNews #FireAccident #NagpurDistrict #DisasterNews #EmergencyResponse #VillageTragedy #FireBrigade #LatestNews #IndiaNews #ReliefOperation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here