गडचिरोली : थकीत कर्जाचा ट्रॅक्टर विक्री फसवणूक प्रकरणी नगरसेवक दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : थकीत कर्ज असलेला ट्रॅक्टर बेकायदेशीररीत्या विक्री करून ७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चामोर्शी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात चामोर्शी नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक दाम्पत्य आशिष अरुण पिपरे व सोनाली आशिष पिपरे, तसेच अरुण लहुजी पिपरे यांच्याविरुद्ध २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात फसवणूक, धमकी व संगनमताचे गंभीर कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चामोर्शी येथील सौ. वंदना रवींद्र कोठारे (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून मेस्सी कंपनीचा ट्रॅक्टर (MH-33 V-8075) विक्री केल्याचे भासवले. प्रत्यक्षात सदर ट्रॅक्टरवर हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे सुमारे ४ लाख ८० हजार रुपये कर्ज थकीत असताना हा व्यवहार करण्यात आला.
तक्रारीनुसार, ट्रॅक्टर मूळतः अरुण लहुजी पिपरे यांच्या नावावर असताना तो सोनाली आशिष पिपरे यांच्या नावाचा असल्याचे भासवण्यात आले. ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर ७ लाख ५० हजारांचे आपसी विक्रीपत्र तयार करून ट्रॅक्टर विक्री करण्यात आली. ही रक्कम आरटीजीएस प्रणालीद्वारे सौ. वंदना कोठारे यांच्या पतीच्या खात्यातून नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर थकीत कर्जामुळे संबंधित फायनान्स कंपनीने सौ. कोठारे यांच्या राहत्या घरातून ट्रॅक्टर जप्त केला. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रकमेची मागणी केली असता, आशिष अरुण पिपरे व अरुण लहुजी पिपरे यांनी शिवीगाळ करून “बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
विद्यमान नगरसेवक दाम्पत्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून तपासाला वेग देण्यात आला आहे.
एसआयटी चौकशीची मागणी : महिलांचे उपोषण
दरम्यान, या प्रकरणासह चामोर्शी तालुक्यातील विविध अन्यायाच्या तक्रारींबाबत गेल्या पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त महिलांचे ठिय्या व उपोषण सुरू आहे. या आंदोलनात सौ. वंदना कोठारे यांचे फसवणुकीचे प्रकरण ठळकपणे मांडण्यात आले असून, आशिष पिपरे यांची एसआयटी चौकशी करण्याची ठाम मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत असताना, प्रशासनाकडून प्रत्यक्षात एसआयटी स्थापन होणार काय, याकडे चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #news














