मुरूमगाव पोलिसांनी गोतस्करीचा कट उधळला : सहा गोवंशांना जीवनदान

2

मुरूमगाव पोलिसांनी गोतस्करीचा कट उधळला : सहा गोवंशांना जीवनदान
– दोघांना अटक, 5.23 लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता. प्र / मुरूमगाव, दि. २६ : कत्तलीसाठी अवैधरीत्या नेण्यात येणाऱ्या गोवंशांविरोधात मुरूमगाव पोलिसांनी धडक कारवाई करीत गोतस्करीचा कट उधळला आहे. या कारवाईत सहा गोवंशांना जीवनदान देण्यात आले असून दोघा आरोपींना अटक करत 5.23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुरूमगाव पोलिस स्टेशन येथील पोलिस पथकाला अवैध गोवंश वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळताच 23 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान कत्तलीसाठी अमानुषपणे पिकअप वाहनात कोंबून नेण्यात येणाऱ्या सहा गोवंशांची यशस्वी सुटका करण्यात आली.
या प्रकरणी जावेद अहमदअली सय्यद (रा. रांगी) व ऐफाश रिआजली सय्यद (रा. रांगी) या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली. घटनास्थळावरून पिकअप वाहनासह सुमारे 5.23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अवैध जनावर वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, धानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत हेड कॉन्स्टेबल माहूरकर व कॉन्स्टेबल कोडाप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गोवंशांची सखोल आरोग्य तपासणी करून पुढील देखरेख व संगोपनासाठी कायदेशीररित्या ध्येय फाउंडेशन गोशाळा, गराडा येथे सुपूर्द करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here