अहेरी परिसर हादरला! मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के

11

अहेरी परिसर हादरला! मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के
– नागरिकांमध्ये भीती
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यातील अहेरी परिसरात बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री ११.५१ ते ११.५९ या कालावधीत अहेरी, आलापल्ली व सिरोंचा परिसरात जमिनीला कंपने जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचे केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्हा येथून रामगुंडमपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत या भागाला बसलेला हा पाचवा भूकंपाचा धक्का असल्याची माहिती समोर आली आहे.
काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, झोपेत असतानाच अचानक जमिनीला कंपन जाणवू लागल्याने सुरुवातीला अवजड वाहनांची ये-जा असावी, असे वाटले. मात्र कंपन वाढत गेल्याने व बाहेर नागरिकांची आरडाओरड सुरू झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर हे भूकंपाचे धक्के असल्याची खात्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसराच्या जवळपास कोळसा व अन्य खाणी असल्याने संभाव्य धोक्याबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, विशिष्ट भौगोलिक रचना आणि खाणकामामुळे हा संपूर्ण भाग ‘भूकंपप्रवण क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही, मात्र प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Earthquake #Gadchiroli #Aheri #MildEarthquake #SeismicActivity #RichterScale #PublicSafety #BreakingNews #MidnightTremors #MaharashtraNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here