‘मेक इन गडचिरोली’ अगरबत्ती प्रकल्पाची CBI, ED किंवा SIT मार्फत चौकशी करा

15

‘मेक इन गडचिरोली’ अगरबत्ती प्रकल्पाची CBI, ED किंवा SIT मार्फत चौकशी करा
– नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांची मागणी, बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : ‘मेक इन गडचिरोली’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पाबाबत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची CBI, ED किंवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले असून सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना पिपरे म्हणाले की, जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने ‘मेक इन गडचिरोली’ उपक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, बँक ऑफ इंडिया आरसेटी व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून उद्योगयात्रा आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत अनेक महिलांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अगरबत्ती उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव सादर केले.
या प्रकल्पात त्यांच्या पत्नी सौ. सोनाली आशिष पिपरे, आई मायाताई अरुण पिपरे व भावाची पत्नी उषा हरेश पिपरे सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना एकत्रितपणे उद्योग करता यावा यासाठी स्वतःची जागा केवळ एक रुपये प्रतिकिलो कमिशनवर उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला.
मशीन खरेदीप्रकरणी सुरुवातीला १ लाख १८ हजार रुपयांचे कोटेशन सादर करण्यात आले होते. मात्र ऑनलाइन तपासणीअंती मशीनची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांच्या संमतीने ९० हजार रुपयांत खरेदी केल्याचे पिपरे यांनी सांगितले. मागील तीन वर्षांत प्रत्येक मशीनवर ४ ते ५ टन उत्पादन झाले असून सध्या मशीन सुस्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित महिलांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे हमीपत्र दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बँक व्यवस्थापनाने अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन नियमबाह्य पद्धतीने वसुलीचा तगादा लावल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्ज हे अनुदानित (सब्सिडी) असून शासनाची बँक हमी असतानाही महिलांना घरजप्तीची भीती दाखवून मानसिक त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले.
आपल्या विरोधात राजकीय कट रचला जात असल्याचा आरोप करताना पिपरे यांनी काही विरोधकांची नावे घेत गंभीर आरोप केले. नगरपंचायत निवडणुका जवळ आल्याने व आपण नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार असल्याने समाजातील प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाजार समिती व खरेदी-विक्री संघातील कथित घोटाळे उघड केल्यामुळे काही प्रभावशाली व्यक्तींना धक्का बसला असून त्यातूनच बदनामीचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
सोशल मीडियावर पत्नीच्या नावाचा वापर करून बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली आहे. सर्व संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सत्य बाहेर यावे म्हणूनच CBI, ED किंवा SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी, असे स्पष्ट करत पिपरे यांनी राजकीय विरोधकांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here