कुरखेडा : मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा अचानक हल्ला, दोन युवक जखमी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला शेतशिवारात रविवारी (२२) सकाळी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने दोन युवक जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून धमदीटोला गावाच्या वेशीवर बिबट्याचे वावर सुरू असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, बिबट्याने धरमदास उईके व राधेश्याम साहळा यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थ संतप्त होते.
रविवारी सकाळी पटाचा दान असलेल्या परिसरातील सचिन झोळे यांच्या शेताजवळ बिबट्या दिसल्याचे लक्षात येताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी धावले. मका पिकात दडून बसलेल्या बिबट्याला गोंगाट करत हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत प्रतिहल्ला केला. यात चेतन ब्रह्मनायक व आनंदराव कुमरे हे दोघे जखमी झाले. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी सायंकाळपासूनच विभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. सध्या संबंधित मका शेतात बिबट्या दडून असल्याची शक्यता लक्षात घेऊन ड्रोन कॅमेराद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
परिसरात रब्बी हंगामातील शेतीकामे सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतात राहतात. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी नागरिकांनी बिबट्याच्या जवळ जाण्याचे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. सायंकाळी शेतकरी घरी परतल्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हाकलण्याची कार्ययोजना आखण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, कुरखेडा परिसरात वाढत चाललेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #Kurkhda
#LeopardAttack #WildlifeConflict #HumanWildlifeConflict #ForestDepartment #MaharashtraNews #GadchiroliDistrict
#RuralNews #BreakingNews #LeopardSpotted #VillageAlert #AgriFieldIncident














