धानाचे चुकारे रखडले ; कोरचीत शेतकऱ्यांचा संताप उसळला

11

धानाचे चुकारे रखडले ; कोरचीत शेतकऱ्यांचा संताप उसळला
– चुकारे त्वरित जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. २३ : आदिवासीबहुल व मागासलेल्या कोरची तालुक्यात धान हे मुख्य पीक असून हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी आदिवासी विकास महामंडळ मार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
धान खरेदी केंद्रांवर शासनाच्या हमीभावाने विक्री करूनही मोबदला न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पेरणीपूर्व मशागत, बियाणे व खत खरेदी, तसेच कर्जफेड यासाठी निधीअभावी अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडे वळावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. “जगाचा पोशिंदा” असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. धानाचे चुकारे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी दिला.
निवेदन देताना रामसुराम काटेंगे (माजी जि.प. सदस्य), दिपक हलामी (युवक काँग्रेस अध्यक्ष), धर्मराव नैताम (नगरसेवक), लहानू सहारे, विठ्ठल शेंडे, बुधराम फुलकवर, ईश्वर लाडे, बाबुलाल शेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here