कुरखेडा : ग्रामपंचायत शिपाई परीक्षा वादग्रस्त, पेपरफुटीचा गंभीर आरोप

25

कुरखेडा : ग्रामपंचायत शिपाई परीक्षा वादग्रस्त, पेपरफुटीचा गंभीर आरोप
– नव्याने परीक्षा घेण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २१ : तालुक्यातील गट ग्रामपंचायत अरततोंडी येथे घेण्यात आलेली शिपाई पदाची भरती परीक्षा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप अर्जदारांनी करत संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक उमेदवारांनी २ ते ५ वर्षे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करूनही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचा दावा केला आहे. तर याच ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याला १०० पैकी तब्बल ९१ गुण मिळाल्याने संशय अधिकच बळावला आहे. या निकालामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अर्जदारांनी ग्रामसेवक, सरपंच तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, नवीन प्रश्नपत्रिका तयार करून सर्व उमेदवारांना एकाच वेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा घ्यावी व त्याच दिवशी निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आता संबंधित अधिकारी या गंभीर आरोपांकडे कशा पद्धतीने पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here