मूल : कारल्याच्या भाजीवरून संताप अनावर, पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या

11

मूल : कारल्याच्या भाजीवरून संताप अनावर, पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या
The गडविश्व
मूल, दि. २१ : क्षुल्लक कारणावरून मानवी नात्यांचा कळस गाठणारी संतापजनक घटना मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. कारल्याची भाजी का बनवली, या किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईला अमानुष मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सुमित्रा पेटकुले (वय ६५) असे मृतक आईचे नाव असून जगदीश दशरथ पेटकुले (वय ३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जगदीश घरी परतला असता त्याची आई सुमित्रा यांनी कारल्याची भाजी बनवली होती. ही भाजी का केली, या कारणावरून त्याने आईशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुमित्रा पेटकुले यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी जगदीश याला दारूचे व्यसन असल्याची माहिती पुढे आली आहे. वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तो आईसोबत राहत होता.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
एका साध्या घरगुती कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे डोंगरगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचे हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #crimenews #mulnews #dongargao #murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here