कुरखेडा नगरपंचायतीत तणावाला पूर्णविराम ; चारही विषय समिती सभापतींची अविरोध निवड

66

कुरखेडा नगरपंचायतीत तणावाला पूर्णविराम ; चारही विषय समिती सभापतींची अविरोध निवड
– वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपानंतर सत्ताधाऱ्यांत समन्वय
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २० : नगरपंचायतीतील वार्षिक विषय समिती सभापती निवडणुकीवरून गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाला अखेर पूर्णविराम मिळाला. सत्ताधारी गटातील मतभेद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले असताना, वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपानंतर चारही विषय समिती सभापतींची निवड सर्वानुमते अविरोध पार पडली.
कुरखेडा नगरपंचायत येथे सुरुवातीच्या वर्षाचा अपवाद वगळता मागील तीन वर्षांपासून भाजप, शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक एकत्रितपणे सत्तेत सहभागी होते. मात्र अलीकडे दोन कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांतच दोन गट पडले. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले आणि स्वपक्षीय नगरसेवकाविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे यंदाची विषय समिती निवडणूक चुरशीची ठरणार, असा अंदाज व्यक्त होत होता.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन भाजप व शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांत समन्वय साधला. परिणामी, चारही विषय समित्यांची निवड अविरोध झाली.
बांधकाम समितीचे सभापतीपद उपाध्यक्ष बबलू हुसेनी यांच्याकडे पूर्ववत ठेवण्यात आले. स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती सभापतीपदी भाजपचे सागर निरंकारी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या प्राची धोंडणे, तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या कांताबाई मठ्ठे यांची निवड झाली. उपसभापतीपदी भाजपचे दुर्गा गोटेफोडे यांचीही अविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल, माधवदास निरंकारी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये तसेच तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसंजित प्रधान यांनी, तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांनी जबाबदारी पार पाडली.
तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अखेर सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे नगरपंचायतीतील राजकीय वातावरणात सुसंवादाची नवी सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here