गडचिरोली पोलिस दलातर्फे 120 युवक-युवतींना चारचाकी चालक प्रशिक्षण पूर्ण
– अतिदुर्गम भागातील तरुणांना रोजगाराची नवी दिशा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : माओवादग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल यांच्या दादालोरा खिडकी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमाला आणखी एक यश मिळाले आहे. चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 120 प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ आज पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे उत्साहात पार पडला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्किलिंग इन्स्टिट्यूट, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 13 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात एटापल्ली, जीमलगट्टा, सिरोंचा आदी अतिदुर्गम भागांतील 90 पुरुष व 30 महिला अशा एकूण 120 युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थ्यांना वाहन चालविण्याचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक धडे देण्यात आले. तसेच त्यांना लर्निंग परवाना काढून देण्यात आला असून, कायमस्वरूपी वाहनचालक परवाना मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे, स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 1130 युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी परवाने मिळवून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्याचा आधार मिळत असून, आत्मनिर्भरतेकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
निरोप समारंभात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी युवक-युवतींनी मिळालेल्या संधीचा सकारात्मक उपयोग करून स्वतःसह कुटुंबाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील तरुणांना नवी उमेद आणि रोजगाराची ठोस दिशा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.














