हेडरीत सीआरपीएफचा सिविक ॲक्शन उपक्रम ; ३०० ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य वाटप

20

हेडरीत सीआरपीएफचा सिविक ॲक्शन उपक्रम ; ३०० ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य वाटप
The गडविश्व
एटापल्ली, दि. १९ : सी/191 वी वाहिनी, केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) हेडरी यांच्या वतीने हेडरी येथे सिविक ॲक्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील नागरिकांशी विश्वासाचे नाते दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला सुमारे ३०० ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास पोलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) गडचिरोली अजय कुमार शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कमांडंट सत्य प्रकाश, द्वितीय कमान अधिकारी राजीव रंजन कुमार सिंह, उपकमांडंट उमाशंकर प्रसाद, पोलीस उपविभागीय अधिकारी हेडरी योगेश रांजणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी परमपूज्य बिरसा मुंडा व क्रांतिकारक बाबूराव सेडमाके यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सिविक ॲक्शन कार्यक्रमांतर्गत हेडरी, मंगेर, पुरसलगोंडी, रेकनार, मल्लमपाडी, सुरजागड, पामाजीगुडा, पुसुमपल्ली, अलेंगा, अल्लुर, इतुलनार, नंडेर, बोडमेटा व गोडेली या गावांतील ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना ब्लँकेट, संगणक साहित्य, शालेय पुस्तके, पेन ड्राइव्ह तसेच इतर जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
अजय कुमार शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील युवक-युवतींच्या आकांक्षांना बळ देणे, आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच औद्योगिक प्रगती आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणे हा आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद व विश्वास निर्माण करणे हीच खरी यशस्वीता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहायक कमांडंट संतोष प्रल्हाद दरागे व सहायक कमांडंट साकेत विक्रम सिंह यांनी उपस्थित ग्रामस्थ व पत्रकारांचे आभार मानले. विश्वास, विकास आणि संवादाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here