बोर्ड परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जा, घवघवीत यश मिळवा : आमदार सुधाकर अडबले
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयाला आज विधान परिषदेचे सदस्य तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांनी भेट देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. येऊ घातलेल्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून आत्मविश्वासाने पेपर लिहावेत आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच मोठे यश संपादन करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी झटले पाहिजे, असे प्रेरणादायी शब्दांत आमदार अडबले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे वातावरण पाहायला मिळाले.
शाळेत आगमन होताच मुख्याध्यापक बी.डब्ल्यू. सावसाकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आमदार अडबले यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजय लोंढे, शिक्षक नरेंद्र भोयर, बापू मुन्घाटे, मशाखेत्री, दिवाकर भोयर, एस. व्ही. नागदेवते, कु. बी. व्ही. श्रीरामे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आमदार अडबले यांच्याशी संवाद साधत परीक्षेसंदर्भात विविध शंका विचारल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.














