गडचिरोली : पोलिसांच्या नावाने दहशत, नागरिकांना धमक्या देणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या

45

गडचिरोली : पोलिसांच्या नावाने दहशत, नागरिकांना धमक्या देणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : ‘वरिष्ठ पोलिस निरीक्षक बोलतोय… तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आहे’ असा धाक दाखवत नागरिकांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया अधिकाऱ्याचा अखेर भांडाफोड झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धडक कारवाई करत सायबर पथकाने आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चंदन दिगूराम सांगळे (३०, रा. आष्टी, ता. चामोर्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीई (अभियांत्रिकी) पदवीधर आहे. उच्चशिक्षित असतानाही त्याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करत इंटरनेटवरून विविध हॉटेल चालक, लॉज मालक व व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक मिळवले. त्यानंतर स्वतःला ‘वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील’ अशी खोटी ओळख देत फोनवरून अटक करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची मागणी केली जात होती.
अहिल्यानगर येथील एका व्यावसायिकाने धमकीनंतर तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. कॉल डिटेल्स, आयपी लॉग्स व डिजिटल विश्लेषणातून आरोपीचे लोकेशन गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक तातडीने गडचिरोलीत दाखल झाले. पोलिस येत असल्याची खबर लागताच आरोपीने दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त भागातही पोलिसांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्याला जेरबंद केले. कारवाईदरम्यान आरोपीकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध आणि येथे यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याला अखेर कायद्यानेच धडा शिकवला आहे. नागरिकांनी अशा धमकीच्या कॉल्सबाबत तत्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here