कुरखेडा–काढोली मार्गावर निकृष्ट दर्जाचा पॅचवर्क ; एका दिवसात उखडले डांबर
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : कुरखेडा–काढोली मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेले पॅचवर्क पूर्णतः निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या एका दिवसात डांबर-गिट्टीचे पॅच उखडून पडल्याने रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक बिकट झाली आहे. लावलेले डांबर बाजूला सरकले असून गिट्टी उघडी पडली आहे. परिणामी, वाहनचालकांना पुन्हा खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, कामात कोणतीही गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. “पॅच लावून दुसऱ्याच दिवशी तो निघून जात असेल, तर हे काम कशासाठी?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कामांमुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढते आणि अपघातांचा धोका अधिक तीव्र होतो. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. “करदात्यांचा पैसा वाया घालवून केवळ दिखाऊ कामे केली जात आहेत,” असा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














