एटापल्लीच्या रस्त्यांसाठी पत्रकारांचा एल्गार ; तिसऱ्या दिवशीही प्रशासन ढिम्म
– प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरीकांकडुन नाराजी
The गडविश्व
एटापल्ली, दि. ११ : तालुक्यातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दुरवस्थेविरोधात एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेने पुकारलेल्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात आणि त्यानंतरही रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.अनेकवेळा निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप करत शेवटी पत्रकारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असतानाही प्रशासनाचा कोणताही वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही. प्रशासनाच्या या मौन आणि आडमुठ्या भूमिकेमुळे पत्रकारांसह सामान्य नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
पत्रकारांच्या या लढ्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. अनेक स्थानिक सामाजिक संस्थांनी रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनीही या रास्त मागणीसाठी पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.
आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात असून, येत्या २४ तासांत प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अन्यथा, हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम लेखी आश्वासनासह प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. पत्रकारांची लेखणी आता रस्त्यांच्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरली आहे.
— रविंद्र रामगुंडेवार अध्यक्ष,पत्रकार संघटना एटापल्ली














