शासकीय रुग्णालयातील उपचार विनामूल्यच ; शासनाने ‘ती’ चूक केली दुरुस्त
– शासन निर्णय जारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार सेवा पूर्णतः विनामूल्य असल्याचे शासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांच्या सनदेमधील दर नमूद करण्याबाबत झालेली अनवधानाची चूक दुरुस्त करत यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक रुशुफी-२०२३/प्र.क्र.१६७/आरोग्य-३, दि. २३ ऑगस्ट २०२३ अन्वये शासकीय रुग्णालयांतील तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आले आहेत. त्यानंतर शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०४/नोंदणी शाखा, दि. १६ जानेवारी २०२६ द्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र, संबंधित सनदेमधील परिशिष्ट-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी शासनमान्य दर नमूद करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. हे दर दि. ६ जून २०१५ च्या जुन्या निर्णयानुसार अनवधानाने समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शुद्धिपत्रक जारी करत परिशिष्ट-तीन रद्द केले आहे.
या शुद्धिपत्रकानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सर्व तपासणी, उपचार व वैद्यकीय सेवा पूर्णतः निःशुल्क राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, शासकीय रुग्णालयांमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची खात्री आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FreeHealthcare #PublicHealthDepartment #GovernmentResolution #CitizensCharter #HealthcareUpdate #MaharashtraGov #FreeTreatment #HealthServices #OfficialUpdate
Treatment in Government Hospitals Completely Free; Error in Citizens’ Charter Corrected – Government Resolution Issued














