जिल्हा रुग्णालयात दोन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिर ; ३४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली,दि. १० : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जन्मजात आजार असलेल्या बालकांसाठी आयोजित दोन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ३४ बालकांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. या शिबिरामुळे दुर्गम भागातील बालकांना तज्ज्ञ उपचारांची सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध झाली असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आरबीएसके अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करून जन्मत: आजार असलेली बालके शोधली जातात. पुढील उपचार, विशेष तपासण्या, निदान निश्चिती व शस्त्रक्रियेसाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) मार्फत द्वितीय व तृतीयस्तरीय आरोग्य सेवा पुरविली जाते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. बागराज धुर्वे तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्या नियोजनातून ०७ व ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी नागपूर येथील इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्सच्या तज्ज्ञ चमूतील डॉ. मनीषा अलबल (वरिष्ठ बाल शल्य चिकित्सक), डॉ. मानसी अन्भारे (वरिष्ठ बाल भूलतज्ज्ञ) यांच्यासह इतर तज्ज्ञ शल्य चिकित्सक उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने डॉ. माधुरी किलनाके व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.
दोन दिवसांच्या शिबिरात हर्निया, हायड्रोसील, फायमोसीस व इतर जन्मजात आजारांवरील पहिल्या दिवशी १८ तर दुसऱ्या दिवशी १६ अशा एकूण ३४ शस्त्रक्रिया पार पडल्या. यामध्ये डॉ. नागसेन साखरे, डॉ. कृणाल चेंडकापुरे, डॉ. मित्तल गेडाम, डॉ. समीर बनसोडे, ओटी इन्चार्ज श्रीमती नांदगाये व संपूर्ण ऑपरेशन थिएटर चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरविताना अनेक अडचणी असल्या तरी आरबीएसके व डीईआयसीच्या माध्यमातून वेळेवर निदान, योग्य सल्ला, समुपदेशन व तज्ज्ञ उपचार मिळत असल्याने बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे शक्य होत आहे. जन्मजात आजारांबाबत पालकांनी वेळीच आरबीएसके, सामान्य रुग्णालय गडचिरोली व डीईआयसी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














