दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा–सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप
– श्वेता कोवे क्रीडा नगरीत उमटला आत्मविश्वासाचा जल्लोष
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देत जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप झाला. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्वेता कोवे क्रीडा नगरी, पार्वती निवासी मतिमंद विद्यालय, देसाईगंज येथे दोन दिवसीय भव्य आयोजन करण्यात आले.
स्पर्धांचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष लताताई सुंदरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर, तहसीलदार प्रीती डूडुलकर व गटविकास अधिकारी लुमदेव जुवारे उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडाध्वजाला सलामी देत स्पर्धांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व खाजगी दिव्यांग शाळांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी जिद्द, कौशल्य व आत्मविश्वासाचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व आत्मविश्वास पाहून मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमात क्रीडास्पर्धांसोबतच विद्यार्थ्यांना कला-कौशल्य सादर करण्याचीही संधी मिळाली. सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, गीत व विविध सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी केले. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याची माहिती चेतन हिवंज यांनी दिली.














